मुहूर्त पहाणे योग्य का अयोग्य?
मुहूर्त म्हटले की भास्कराचार्य-लीलावतीची गोष्ट हमखास सांगितली जाते. लीलावती ही भास्कराचार्यांची लाडकी लेक. तिच्या कुंडलीत वैधव्ययोग होता. पण भास्कराचार्यांनी असा विवाहाचा मुहूर्त शोधून काढला की तिचा वैधव्ययोग टळेल. पण विवाहाचे वेळी अक्षतेचा दाणा का मणी घटिकापात्रात पडलेने तो तळाशी जावून भोकात अडकला व मुहूर्त चुकला व शेवटी व्हायचे तेच झाले. या दंतकथेच्या छटा बदलतात पण आशय तोच. मुहुर्ताची महती. थोडा इकडेतिकडे झाला की काय उलथापालथ?
मे महिना म्हणजे सुट्टी,लग्नसराईचे दिवस. आता या काळात लग्नाचा मुहूर्त नाही म्हणजे गैरसोयच नाही का? कार्यालयाची उपलब्धता हा पण हल्ली एक महत्वाचा मुद्दा झाला आहे. मुहूर्त असलेल्या तारखांना कार्यालय मिळणे हे देखील भाग्यच मानायची वेळ आली आहे. पंचांगात रेडीमेड मुहूर्त दिलेले असतात. पण हे रेडिमेड मुहूर्त सुद्धा 'लाभतात` की नाही हे बघावे लागते. जसे रेडिमेड कपडे सर्वांनाच 'फिट` होतील असे नसतात कधी कधी ते 'अल्टर` करावे लागतात तसेच मुहूर्ताचे आहे. एखादी वेळ ही कुणासाठी आनंदाची असते तर कुणासाठी दु:खाची असते, कुणासाठी कसोटीची असते तर कुणासाठी निवांतपणाची असते, कुणासाठी जोडायची असते तर कुणासाठी तोडायची असते, कुणाची जन्माची असेल तर कुणाची मृत्यूची असेल. कुणाची कशीही असो ती ग्रहांच्या सोयीची असते म्हणून तिला मुहूर्त म्हणायचे. एकदा पेपरमध्ये बातमी आली होती की इ.स. २००० मे,जून मध्ये मुहूर्त नाहीत म्हणून. कारण त्या काळात गुरु,शुक्राचा अस्त होणार होता. विवाहासारख्या महत्वाच्या संस्काराचे वेळी गुरु शुक्रासारख्या शुभ ग्रहांची उपस्थिती नाही म्हणजे त्यांचे आशिर्वाद, नैतिक बळ नाही. मग मंगळ शनी सारख्या दुष्ट ग्रहांचे चांगलेच फावले की? कुणाला वैधव्य दे, कुणाचे सासू-सासरे मार, कुणाला अपघात कर, कुणाला सासुरवास कर असा धुडगूूस ते घालतील. मग काही नडलंय का मुहूर्त नसताना लग्न करायला ? मुहूर्त म्हणजे खरं तर कार्याच्या सोयीची पूर्वनियोजित वेळ. पण तिला शुभाशुभत्वाची कल्पना एवढी घट्ट चिकटली आहे की बोलता सोय नाही. पंचांगात दिलेले रेडिमेड मुहूर्त खरं तर अंदाजपंचे असतात. पण गुरुजींनी स्वत: काढून दिलेला मुहूर्त केवळ पंचांगात दिसत नाही म्हणून लग्नाची ठरलेली तारीख बदलण्याचा प्रसंग मी पाहिलेला आहे. तारीख ठरली, कार्यालय ठरलं, पण मुलाच्या ज्योतिष-शिक्षित भावजयीच्या लक्षात आलं की ठरवलेला मुहूर्त पंचांगात दिलेला नाही. त्यांची समजूत घालण्याचा प्रयत्न केला. त्यांना हेही सांगितलं की गुरुजींनी वधूवरांच्या पत्रिका पाहून मुहूर्त काढलाय्. तो पंचांगात नसेना का? पण नाही. मग काय? तारीख बदला. आता आली का पंचाईत? दुसऱ्या तारखेला हॉल बुक करा. नशीबानं म्हणजे योगायोगानं ती तारीख त्याच हॉलसाठी उपलब्ध झाली म्हणून ठीक नाहीतर मुलीकडच्यांचे पैसे पाण्यात !
आता, पंचांगात लग्नाचे मुहूर्त नाहीत म्हणून लग्न व्हायची थोडीच रहाणार आहेत! ज्यांना कसंही करून लग्न करायचचं आहे ते कशाला कशाला मुहूर्तासाठी अडून बसतील ? ज्यांना मुहूर्त न पहाता लग्न केल्याची रुखरुख वाटणार असेल त्यांच्या सोयीसाठी कुठला तरी 'शास्त्राधार` देउन मुहूर्त दिले जातात. एखादे धर्म-संकट कोसळले की शास्त्राधार शोधले जातात व ते मिळतातही. या फलज्योतिषाचं अगदी कायद्यासारखं आहे. वाटा तेवढया पळवाटा. पण एवढा द्राविडी प्राणायम करीत बसण्यापेक्षा आपल्या सोयीची तारीख-वेळ घेतली तर काय वाईट?
समजा एवढं सगळं करून मुहूर्तावर लग्न केलं आणि संसार विसकटला तर मग ? त्यालाही उत्तर आहे. जर तुमच्या जन्मकुंडलीतच विवाहसौख्य नाही तर कितीही चांगला मुहूर्त पाहिला तरी काय उपयोग ? जे आडातच नाही ते पोहऱ्यात कुठून येणार? एका ज्योतिषाला एकदा मी विचारल, '' काहो, आता डॉक्टरी शास्त्रामुळे प्रसूतीची वेळ पुढे मागे करता येते. म्हणून चांगल्या मुहूर्तावर मूल जन्माला घालणे डॉक्टरांना सहज शक्य आहे. म्हणजे भविष्य ठरवणं त्यांच्या हातात आलं की नाही ? त्यावर त्यांनी शांतपणे सांगितलं की, '' अस जन्माला येणे हे निसर्गाला धरून नसल्यानं जन्मकुंडलीचे नियम तिथे लागू होत नाहीत.`` मुहूर्ताची महती काय सांगावी. निवडणुकीचे फॉर्म सुद्धा मुहूर्तावर भरणे जरूरीचे मानतात. उगाच पनौती नको. प्रचाराचा प्रारंभसुद्धा मुहूर्तावरच होतो. कुणीतरी एकच उमेदवार निवडून येणार हे सर्वांना जरी माहीत असले तरी आपण आपल्या बाजूने काळजी घ्यावी. त्यातूनही अपयश आलंच तर नशीब, प्राक्तन आहेच.
वरील विवेचनावरून आपल्या लक्षात आले असेल की मुहूर्ताना महत्व देणं - न देणं हे आपल्या मानसिकतेवर अवलंबून आहे.
स्त्रोत - येथे पहा.