" प्रणम्य शिरसा देवं गौरीपुत्रं विनायकम ॥ भक्तावासं स्मरेन्नित्यमायु:कामार्थसिद्धये ॥१॥ "



...कधीतरी बोलावेच लागेल !!
आजकाल कुटुंबाची व्याख्याच बदलत चालली आहे. "वसुधैव कुटुंबकम्‌' म्हणता म्हणता एका छताखाली राहणारी माणसं मात्र लॉजवर राहिल्यासारखी एकमेकांशी त्रयस्थासारखी वागत आहेत.

"छोटं कुटुंब; सुखी कुटंब' हे सूत्र काही प्रमाणात आजच्या विसंवादाला कारणीभूत आहे. विसंवादामागे तणाव वगैरे अन्य अनेक कारणे असली तरी घरातील प्रत्येकच व्यक्तीचं स्वतःचं असं विश्‍व निर्माण झालेलं आहे आणि माझ्या मते हेच मुख्य कारण आहे. पूर्वीच्या काळी पतीच्या वाटेकडे संध्याकाळी डोळे लावून बसणारी, त्याच्याशी संवाद साधण्याची ओढ असणारी स्त्री आता अपवाद म्हणूनसुद्धा आढळणे अशक्‍य. पूर्वीचे पतीदेखील कचेरी सुटल्यावर घराच्या ओढीने धावत असत.

आज पती-पत्नी दोघेही कमावते. त्यांच्या वेळा एकत्र येणे दुरापास्त. महत्त्वाची गोष्ट म्हणजे त्यांची संवादाची भूक परस्पर आपापल्या कामाच्या ठिकाणीच भागून जाते. संवाद हा घरापेक्षा घराबाहेरच होऊ लागल्याने साहजिकच माणसाला घरी आल्यावर शांतपणे टीव्हीपुढेच बसणे योग्य वाटू लागले आहे ! ही दरी सांधायची असेल तर संवाद हा दोन्ही बाजूंनी मनापासून व्हायला हवा. फक्त एकाने संवाद साधायचा व दुसऱ्याने तो कपाळावर आठ्या घालत, वर्तमानपत्रात डोकं खुपसून ऐकायचा, याला संवाद म्हणता येणार नाही.

दुसरा एक उपाय मला सुचवावासा वाटतो. काहीसा विनोदी वाटेल; पण तो खरोखरीच अमलात आणल्यास कुटुंबातील संवाद वाढण्यास नक्कीच मदत होईल. तो उपाय असा ः संध्याकाळी संपूर्ण कुटुंब घरी आल्यावर कोणीही टीव्ही अथवा संगणक सुरू करून त्यापुढे न बसता मुकाट्याने एकमेकांसमोर तासभर बसायचे. किती वेळ गप्प बसतील ? शेवटी, माणूस हा मुळातच संवादप्रिय प्राणी आहे. दोन व्यक्तींमध्ये कुठलाही भौतिक अडथळा आला नाही तर त्यांच्यात संवाद हा घडणारच !

- ऍड. विनिता गुजर, पुणे

--------------------------------------------------------------
पर्यटन, भटकंती हा उत्तम उपाय
आम्ही पती-पत्नी दोघे नोकरी करत असल्याने दिवसभर बाहेरच असतो. मुलगाही दिवसभर शाळेत असतो. आम्ही सकाळी नऊ वाजता घर सोडतो आणि रात्री आठ वाजेपर्यंत घरी येतो. घरी आल्यावर पत्नी स्वयंपाकात गुंतते. नाहीतर मुलाचा अभ्यास तिला घ्यावा लागतो. कधीकधी मीही त्याचा अभ्यास घेतो. परिणामी, आमचे तिघांचे असे बोलणे फारच कमी होते. तिघांना रविवारची सुट्टी असते. त्या दिवशी तिघेही एकत्र असतो. घरीच जेवणाचा चांगला बेत करतो. गप्पा मारत मारत जेवणाचा आनंद घेतो किंवा कधी कधी बाहेरही जेवायला जातो. संध्याकाळी मस्तपैकी बाहेर फिरायला जातो. नदीकाठी गार वारा अंगावर घेत दिवसभरातील घडामोडींच्या गप्पांत व हास्यविनोदांत रमून जातो.

आम्हाला पर्यटनाची आवड असल्याने सुट्टीच्या दिवशी आम्ही फिरायलाही; खास करून धार्मिक स्थळी जातो. राज्यातील विविध धार्मिक स्थळे आम्ही आजवर पाहून आलो आहोत. याचे झालेले फायदे असे ः

१) नेहमीच्या धकाधकीच्या जीवनातून बाहेर पडून थोडी उसंत मिळायला लागली व एकत्र असल्यामुळे संवाद साधता आला.
२) धार्मिक स्थळांना भेटी दिल्यामुळे मनःशाती मिळू लागली.
३) बाहेर फिरायला जायला लागल्यामुळे संसार, नोकरी, घरदार या नेहमीच्या गोष्टींमधून बाहेर पडून नव्या विश्‍वात रममाण व्हायला शिकलो. पत्नी आणि मुलाशी विविध विषयांवर बोलायला मिळाले.

थोडक्‍यात, विसंवाद टाळण्यासाठी आणि सुसंवाद साधण्यासाठी पर्यटन आणि भटकंती हा उत्तम उपाय ठरू शकतो.

- संतोष जोशी, वाई (जि. सातारा)

--------------------------------------------------------------
विसरायला शिका !
१) "रात गई, बात गई' या उक्तीनुसार वागा. भांडणे, गैरसमज विसरून पुन्हा नव्याने कामाला लागा.
२) सकाळी प्रसन्न मुद्रेने एकमेकांना अभिवादन करा.
३) परस्परांना पुरेसा वेळ द्या. परस्परांचा मान राखा. परस्परांच्या आवडी-निवडींबाबत दक्ष राहा.
४) दिवसांतून चार-पाच वेळा तरी परस्परांची चौकशी करा.
५) कुटुंबातील सर्व सदस्यांचे वाढदिवस लक्षात ठेवून त्यांना न चुकता शुभेच्छा द्या.
६) अधूनमधून बदल म्हणून सहल आयोजित करा.
७) परस्परांच्या कामांत रुची दाखवा.
८) आईने, पत्नीने किंवा घरातल्या कोणत्याही गृहिणीने केलेल्या स्वयंपाकाला दाद द्या.
९) "इगो' शक्‍यतो असू नये. असल्यास त्यातल्या "गो'प्रमाणे त्याला घालवा.
१०) एकमेकांचे दोषारोप काढणे, चुका काढणे टाळा. सर्वांसमक्ष कुणाचा अपमान करू नका.
११) जेव्हा शक्‍य असेल तेव्हा "आय लव्ह यू' जरूर म्हणा. अर्थातच अतिरेक टाळा !
१२) चूक झाल्याचे लक्षात येताच क्षणार्धात माफी मागा. विसरायला शिका.
१३) इतरांबरोबर तुलना करू नका.
१४) वाईट वागता येतं, तसं चांगलंही वागता येतंच ना ? शक्‍यतो चांगलंच वागा ! द्वेष, मत्सर, क्रौर्य इत्यादी विकार टाळा.
१५) वेळ तर द्याच; पण दिलेली वेळ पाळा.
१६) केवळ स्वयंपाकातच नव्हे; तर प्रत्येक कामात एकमेकांना मदत करा.

- सिद्धार्थ बेंद्रे

--------------------------------------------------------------
संवादाची दक्षता प्रथमपासूनच घेतली
माझा स्वभाव बडबड्या असल्यामुळे आमच्या घरात सतत हसते-खेळते वातावरण असते. विसंवादाची दरी निर्माण होऊ नये म्हणून आम्ही पती-पत्नीने प्रथमपासूनच दक्षता घेतली. आमचे दोन्ही मुलगे १२-१५ वर्षांचे झाल्यापासून आम्ही त्यांच्याशी मैत्रीचे संबंध प्रस्थापित करण्यास सुरवात केली. घरात काही वस्तू, उदाहरणार्थ ः टीव्ही, फ्रीज, डायनिंग टेबल इत्यादी खरेदी करायचे असल्यास आम्ही त्यांच्याशी चर्चा करायचो. वाढदिवस कसा साजरा करायचा, हेही आम्ही त्यांना आधी विचारायचो व चर्चा करून योग्य तो मार्ग ठरवायचो. हे ठरवितानाही त्यांच्या मनाविरुद्ध काही करत नाही ना, याची दक्षता घ्यायचो. त्यांनी शिक्षण कोणते घ्यावे, हेही आम्ही त्यांनाच ठरवू दिले. त्यामुळे आज ते आनंदी आणि आई-वडील म्हणून आम्ही समाधानी आहोत. मी, पत्नी वर्षा, थोरला मुलगा अनमोल, त्याची पत्नी शिल्पा, धाकटा मुलगा अभिजित असे आम्ही सर्वजण मोठ्या सणांच्या दिवशी ठरलेली कामे चोख पार पाडतो. दिवाळीच्या फराळाच्या वेळी सर्वजण मदत करतात. घरात आम्ही शेजारी, नातेवाईक यांची निंदा कधीही करीत नाही. मुले नोकरी करीत असल्यामुळे रात्री नऊनंतर येणार असतील तर आठ-साडेआठला फोन करून उशीर होणार असल्याचे कळवितात. रात्री एकत्र जेवण्याचा आमचा नियम आहे. मुले, सून सर्वजण नोकरी करीत असल्यामुळे जर कधी त्यांना हॉटेलात जेवण्याचा मूड असेल तर आम्ही सर्वजण जातो. त्यांचे मन मोडत नाही. दिवाळीची खरेदीही आम्ही एकत्रच करतो. दर दोन महिन्यांनी संपूर्ण घराची साफसफाई त्यांच्या सुट्टीच्या दिवशी सर्वजण मिळून करतो. हे सर्व सतत संवाद ठेवण्यामुळे शक्‍य झाले आहे.

- चंद्रकांत खोपडे, पिंपळे सौदागर

--------------------------------------------------------------
सुसंवादाची शिकवण मिळाली आईकडून

मी ११ वर्षांपूर्वी सेवानिवृत्त झालो. फिरतीची नोकरी होती माझी. त्यामुळे अनेक कुटुंबांशी अत्यंत जवळून संबंध आला. त्या वेळी असे निदर्शनास आले, की जोपर्यंत मुले शिक्षण घेत असतात, तोपर्यंत घरात खेळीमेळीचे, आनंदाचे वातावरण असते. मुलगा कमावता, विवाहित झाला की मग कुरबुरी सुरू होतात. आमच्या कुटुंबाबाबत मात्र असे कधी झाले नाही. मी निवृत्त झालो, त्या वर्षी मुलाचा विवाह झाला. "घर विकून तुम्ही आजीसह पुण्यातच राहा,' असे मुलगा आणि सून यांनी आम्हाला सुचविले. तेव्हापासून आम्ही दोघे पती-पत्नी, मुलगा, सून, नातू (माझी आईही आजवर होती; पण ती ९१ व्या वर्षी, दोन महिन्यांपूर्वीच वारली) एकत्र राहत आहोत. गेल्या ११ वर्षांत आमच्या कुटुंबात काही वादाचे प्रसंग आलेच नाहीत का? जरूर आले व येतातही. मात्र, त्याच वेळी सर्व जण आपापले विचार सांगून आम्ही तो वाद तेथेच संपवतो. हातचे राखून वागणे, आडपडदा अशा भानगडी आमच्या कुटुंबात नाहीत.

"मोठ्यांनी मार्गदर्शन करावे; मात्र अट्टहास करू नये,' असे आमचे धोरण आहे. शेवटी आपण ज्यांना मार्गदर्शन करीत असतो, तीही मोठीच असतात. त्यांनाही अनुभव येणे आवश्‍यक असते. त्यांचा एखादा निर्णय स्वतःच्या बुद्धीने घेतला तर घेऊ द्यावा. जर चुकलाच तो निर्णय तर त्यांना आपले म्हणणे पटेल! त्या वेळी वेळ गेलेली असेल; पण प्रपंचातील शहाणपण अशाच गोष्टींमधून मिळते. एकत्र कुटुंबाचे हेच मर्म आहे. आम्ही तेच सांभाळण्याचा प्रयत्न करतो. असे करताना माझ्या आईची शिकवण, तिचाच आदर्श माझ्यासमोर असतो. असाच विचार सर्वांनी केला तर एकत्र कुटुंब पद्धती दृढ होईल. विसंवाद नक्कीच टळतील.

- चंद्रशेखर नगरकर, पुणे

--------------------------------------------------------------

जपला संवादाचा ठेवा

सुदैवाने आमच्या घरात सुरवातीपासूनच म्हणजे अगदी सहज-सरळ घडत आला आहे. समाधानी असणे हे सर्वांत महत्त्वाचे सूत्र. आई-वडिलांनी आम्ही बहीण-भावंडांवर हेच समाधानाचे आणि सुसंवादाचे संस्कार अगदी सहज आचरणातून केलेले आहेत. विसंवादाची दरी निर्माण होणारच नाही यासाठी आणि होऊ नये यासाठी जो मनाचा मोठेपणा; तसेच निर्मळपणा मुळातच असावा लागतो, तसा तो आमच्या घरात सुरवातीपासूनच आहे. तसे प्रासंगिक मतभेद वा विसंवाद थोडे-बहुत असायचेच, हेही खरे. पण तसे ते नसतील तर मग कुटुंबात रसरशीतपणा व जिवंतपणा कसा येईल ?

घरातून बाहेर पडताना एकमेकांना तशी कल्पना देऊनच आम्ही बाहेर पडतो. घरात असताना प्रसन्नपणे संवाद ठेवतो. उत्तम ग्रंथ, धार्मिक-आध्यात्मिक स्वरूपाचे वाचन, सायंकाळी आरत्या असे उपक्रम आमच्या घरी असतात. परस्परांच्या दुःखात मानसिक आधार मिळेल, हे आम्ही पाहतो. एकमेकांची भावनिक विचारपूस करण्यावर आमचा भर असतो. चर्चा-संवाद-विनोद या त्रिसूत्रीवर आम्ही भर देतो. विसंवादाची दरी वाढू देता कामा नये, यासाठी पहिल्यापासूनच प्रयत्नशील राहिले तर मग पुढचे सगळेच प्रश्‍न टळतात.

- संकलन
जिव्हेश्वर.कॉम टिम
मुळ लेखन - प्रा. डॉ. सुनील शिंदे
स्त्रोत - सकाळच्या सप्तरंग या पुरवणीतुन साभार.

 

प्रतिक्रिया (0)
प्रतिक्रिया येथे लिहा
तुमची संपर्क माहिती: (भाषा:-[मराठी ते इंग्रजी किंवा इंग्रजी ते मराठी] बदलण्यासाठी Ctrl+\ वापरा.)
प्रतिक्रिया:
छायाचित्रांकित सुरक्षितता
कृपया छायाचित्रातील वर्गीकरण येथे टाईप करा.