×

Error

The template for this display is not available. Please contact a Site administrator.

पैठणी आणि दागिने

Share

एकीकडे आर्थिक मंदी, तर दुसरीकडे महागाईने गाठलेला उच्चांक यामुळे सध्या सणासुदीच्या दिवसांत स्त्रियांनी आपली हौसमौज आटोक्यात ठेवण्याचा नवा पर्याय शोधला आहे. महिलांचा शॉपिंगमध्ये अग्रक्रम असतो तो पैठण्या आणि दागिन्यांना! परंतु हल्ली त्यांचं पारंपरिक महत्त्व जपत असतानाच त्यांचे रंग व डिझाइन्स यांना नवतेचा स्पर्श झाला आहे.

पैठणी म्हणजे समस्त मऱ्हाटी महिलावर्गाचा जिव्हाळ्याचा विषय! दागदागिन्यांप्रमाणेच पुढच्या पिढीकडे सुपूर्द केल्या जाणाऱ्या वारशात समाविष्ट असण्याचा मान पैठणीला लाभला आहे. मोजक्याच कारागिरांना अवगत असलेल्या या कलेच्या पुनरुज्जीवनासाठी काही महिलांनीच आता कंबर कसली आहे.
उच्च प्रतीचं रेशीम आणि अस्सल सोन्या-चांदीच्या धाग्यांनी विणलेल्या या पैठणी साडय़ांना शालिवाहन काळापासूनचा तब्बल दोन हजार वर्षांचा इतिहास आहे. पैठण, येवला आणि नंतरच्या काळात कर्नाटक, आंध्र प्रदेश या राज्यांमध्ये पैठणी विणण्याची कला विकसित झाली. पैठणीच्या सूक्ष्म कलाकुसरीमुळे दिवसभरात विणकर केवळ एक इंचच साडी विणू शकतो. पूर्ण साडी विणण्यासाठी त्यांना दीड ते दोन र्व्षही लागतात. रेशीम, सोन्या-चांदीचे धागे आणि कारागिराचे कौशल्य यामुळे एका पैठणी साडीची किंमत पाच हजारांपासून अडीच लाखापर्यंत इतकी असते. मात्र, यंत्रमागावर बनलेल्या स्वस्त पैठण्यांमुळे मध्यंतरीच्या काळात अस्सल पैठण्या मागे पडल्या. त्यामुळे विणकरांची झालेली दैन्यावस्था, अपुरं भांडवल आणि सरकारची या कलेविषयीची उदासीनता पाहून या कलेला वाचविण्यासाठी कै. सरोज धनंजय यांनी त्याकाळी पुढाकार घेतला. त्यांच्या ‘न्यू वेव्ह पैठणी’द्वारे १९८९-९० पासून अस्सल पैठण्यांचं प्रदर्शन आयोजित केलं जाऊ लागलं. विणकरांना कर्ज उपलब्ध करून देण्यापासून त्यांच्या पैठण्यांच्या विक्रीव्यवस्था करण्यापर्यंत सरोज धनंजय यांनी सामान्य विणकरांना मदतीचा हात दिला. पैठणीच्या व्यवसायात प्रवेश करणाऱ्या महिला व्यावसायिकांपुढे आज सरोजताई या आदर्श आहेत.

पैठणीवर आता अनेक नवे प्रयोग होऊ लागले आहेत. पारंपरिक चौकटीतून बाहेर पडत पैठणी आता समकालीन होत आहे. पारंपरिक डिझाइन्समध्ये पदरावर मोर, नारळ, कोयरी, बुट्टी असणं मस्ट असायचं. आज मात्र स्त्रियांना यापेक्षा वेगळं काहीतरी हवं असतं. म्हणूनच पारंपरिक डिझाइन्सच्या जागी आता भौमितिक रचनाही दिसू लागल्या आहेत. पैठणीची बॉर्डरही आता छोटी होऊ लागली आहे.

पारंपरिक रंगांच्या पलीकडे पैठणी आता झेपावू लागली आहे. टिपिकल गडद रंगांच्या पलीकडे जाऊन बेबी पिंक, आकाशी, पेस्टल शेड्समधील पैठण्या तरुणाईच्या पसंतीला उतरत आहेत. पैठणीतला धूप-छाँव प्रकार सध्या चलतीत आहे. सध्या इन् आहे ती चंद्रकळा म्हणता येईल अशी काळी पैठणी. पार्टीवेअर म्हणूनही चालणाऱ्या या काळ्या पैठणीला सध्या बरीच मागणी आहे. त्याचप्रमाणे कांजीवरम् प्रकारात जशा वेगवेगळ्या रंगांच्या छटा उपलब्ध असतात, तशाच आता पैठणीतही उपलब्ध होऊ लागल्या आहेत. ग्राहकांच्या रंग आणि डिझाइनच्या पसंतीनुसार आता पैठणीही विणून मिळू लागल्या आहेत.
अस्सल पैठणीच्या किमतीचा फुगीर आकडा लक्षात घेत आपल्या बजेटमध्ये पैठणी बसवू पाहणाऱ्यांसाठी सेमी पैठणीचा पर्यायही उपलब्ध झाला आहे. अस्सल पैठणीत सोन्या-चांदीची जर असते, तर सेमी पैठणीत उच्च प्रतीची जर व धागे मिसळले जातात.

पैठणीला स्वतचं असं एक ग्लॅमर आहे. पाश्चात्य पेहराव घालणाऱ्या मुलींनाही पैठणीची क्रेझ असते. डिझायनर साडय़ांचं कितीही कौतुक केलं तरी ठेवणीतल्या साडय़ांमध्ये एक तरी पैठणी मराठमोळ्या स्त्रीला हवीहवीशी वाटतेच. अशा या जरतारी पारंपरिक पैठणीचं पारंपरिक रूप कायम ठेवत त्यात ‘व्हॅल्यू अ‍ॅडिशन’ केलं तर भल्या भल्या डिझायनर साडय़ांची कशी छुट्टी होऊ शकते, हे तनुजा सावंत यांच्या डिझायनर पैठण्या पाहून कळते.

गेल्या काही वर्षांंत पैठणीच्या नावावर सिंथेटिक धाग्यांची सरमिसळ करीत माफक किमतीत पैठण्या उपलब्ध आहेत, असा दावा करणाऱ्या छोटय़ा-मोठय़ा दुकानांच्या भुलथापांना ग्राहक बळी पडत असल्याचे पाहून तनुजा सावंत या गृहिणीने पैठण्यांबद्दल इत्थंभूत माहिती गोळा केली. त्यासाठी त्या येवल्याला पोहोचल्या. तिथल्या कारागिरांशी बोलून त्यांनी त्यांचं काम जाणून घेतलं. खऱ्या-खोटय़ा पैठण्यांचा फरक समजावून घेतला. तिथल्या विणकरांकडे स्वत तयार केलेल्या डिझाइन्स सोपवल्या. पारंपरिक पैठण्यांच्या नेहमीच्या रंगांहून वेगळे रंग निश्चित केले आणि बावनकशी खरीखुरी पैठणी त्यांच्या हाती आली. स्वत डिझाइन केलेली अस्सल पैठणी पाहून त्यांना जितका आनंद झाला, तितकाच वा त्याहून अधिक आनंद त्यांना त्यांच्या मैत्रिणी आणि परिचित स्त्रियांच्या चेहऱ्यावर उमटलेला दिसला. आणि इथूनच सुरू झाला त्यांचा पैठणीचा घरगुती उद्योग! गेली पाचहून अधिक वर्षे तनुजा डिझायनर पैठणी साडय़ा, पैठण्यांचे कुर्ते आणि पर्सेस बनवीत आहेत.

बांगडी, मोर, कडियाल पैठणी, कमळाचे डिझाइन, पोपट, मुनिया बॉर्डर अशा पारंपरिक डिझाइन्स आणि तुमच्या आवडीनुसार बुट्टी त्या बनवून देतात. डिझायनर पैठण्या या त्यांच्या संकल्पनेत फ्युजन साधण्याचा त्या अजिबात प्रयत्न करीत नाहीत. कारण पैठणीची खासियत तिचं पारंपरिक रूपडं आहे. मात्र, अलीकडच्या काळात पैठणीत केवळ गिन्याचुन्या डिझाइन्स वापरल्या जायच्या. त्यात पारंपरिक अशा पेशवेकालीन डिझाइन्स अंतर्भूत करण्याचा प्रयत्न तनुजा सावंत करतात. एक्स्क्लुसिव्ह डिझाइन्स ही त्यांची आणखी एक खासियत. तसेच त्या पैठण्या आकर्षकरीत्या गिफ्ट रॅपिंगही करून देतात. अत्यंत खास पद्धतीच्या आसावल्ली, फूलपंजा अशा काही खास डिझाइन्सच्या पैठण्या बनवायला एक ते दीड वर्षांचा अवधी लागतो. त्यांची किंमतही ५० ते ७० हजार रुपयांपर्यंत असते, असेही त्यांनी सांगितले.

नुपूर डिझाइन्सच्या सुनीता नागपुरे याही पैठणीच्या कलेला चालना मिळण्याच्या दृष्टीने जाणीवपूर्वक प्रयत्न करीत आहेत. येवल्याचं आजोळ असलेल्या सुनीता यांना पहिल्यापासूनच पारंपरिक पैठणी साडय़ा आणि त्यावरील डिझाइन्स यांचं आकर्षण होतं. पैठण्यांचा पारंपरिक बाज कायम ठेवून त्यात समकालीनता कशी आणता येईल, याबाबत त्या नेहमी विचार करत. जेव्हा त्यांनी पैठणीच्या व्यवसायात प्रवेश करायचं नक्की केलं, तेव्हा त्यांनी येवल्यातील काही विणकरांना एकत्र आणून वेगवेगळ्या डिझायनर पैठण्या बनवायला सुरुवात केली. नावीन्यपूर्ण डिझाइन्स आणि आकर्षक रंगसंगती यावर त्यांचा विशेष भर आहे. निळा, लाल, मोरपिसी, चिंतामणी, फिरोजा, मॅजेन्टा रंगांमध्ये त्यांनी पैठण्या डिझाइन केल्या आहेत. महिलावर्गाला पैठणीचं पारंपरिक रूप भावत असलं तरी नव्या पिढीला त्यात वैविध्य हवं असतं. हे ध्यानात घेऊन पैठणीचे डिझायनर टॉप्स, कुर्त्यांची निर्मिती सुनीता नागपुरेंच्या नुपूर डिझाइन्सने केली आहे. त्यांच्या पैठण्यांनी सीमोल्लंघन करून त्या अमेरिका, कॅनडा, लंडन, ऑस्ट्रेलियामध्येही आता पोहोचल्या आहेत. शाही पैठणी, राजहंस पैठण्या, परिंदा पैठण्या ही त्यांची विशेषता!

ज्योत्स्ना कदम या महिलेनंही स्वतंत्ररीत्या पैठणी साडय़ांचा व्यवसाय सुरू केला आहे. पैठण्या त्या स्वत डिझाइन करतात. डिझाइन आणि रंगांमध्ये वैविध्य देण्याचा त्यांचा प्रयत्न असतो. पोपट, मोराचे नक्षीकाम असलेले देखावे जिवंत वाटावेत, याकडे त्या कटाक्षाने लक्ष पुरवतात.
पैठण्या डिझाइन करणाऱ्या या सगळ्याच स्त्रियांनी त्यांच्या व्यवसायाचं स्वरूप जाणीवपूर्वक घरगुती ठेवल्यामुळे आपोआपच बाकीच्या अनावश्यक खर्चाला आळा बसतो आणि त्यांच्या या अस्सल पैठण्या ब्रँडेड शोरूम्सपेक्षा कितीतरी कमी किमतीला त्या विकतात. केवळ प्रदर्शनांतूनच त्या त्यांच्या डिझाइन्स ग्राहकांसमोर पेश करताना दिसतात.

एकुणात- ‘क्लासेस’पासून ‘मासेस’पर्यंत पोहोचण्याचा पैठणी व्यावसायिक महिलांचा प्रयत्न दिसून येतो. पैठणी ही कुणा अमूक एका वर्गाचीच मक्तेदारी नसून, ती सर्वसामान्यांपर्यंत पोहोचविण्याचा त्या प्रयत्न करीत आहेत. त्यांच्याकडच्या आणि ब्रॅंडेड दुकानांतील पैठण्यांचा दर्जा आणि किमतीतील तफावत बरंच काही सांगून जाते. त्यांच्याशी बोलताना जाणवते ते हे की, नफा कमावण्यापेक्षा स्वत: तयार केलेल्या डिझाइनची पैठणी विकण्यात त्यांना अधिक समाधान व रस आहे.

मुळ लेखन - सुचिता देशपांडे (लोकसत्ता मधून साभार)
स्त्रोत - येथे लिंक आहे.
संकलन - जिव्हेश्वर.कॉम टीम

Share